ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - मुंबईत मेट्रोचे लवकरच विस्तार केला जाईल. याची अधिकृत घोषणा योग्य वेळी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत ७० लाख लोक रेल्वेने प्रवास करतात. राज्य सरकार १७० किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वे नेटवर्क उभारत आहेत. मागील सरकारने यापैकी फक्त १० किलोमीटरचे काम केले आहे. उर्वरित १६० किलोमीटरचे काम आम्ही करीत आहोत. यामुळे ८० लाख लोक प्रवास करू शकतील. जे एवढ्या वर्षात झाले नाही ते दोन वर्षात झाले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी नागपूर मेट्रो रेल्वेसाठी नागपुरातच रोलिंग स्टॉक तयार करण्याकरिता महाराष्ट्र सरकार व चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशन (सीआरआरसी) दरम्यान सामंजस्य करार झाला. याच वेळी कार्यस्वीकृती पत्र (एलओए) हस्तांतरण सोहळाही पार पडला.
राज्यात नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे मेट्रो रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे नागपुरात मेट्रो रेल्वे उभारण्याचे काम सुपर फास्ट गतीने सुरू असल्यामुळे पुण्यातील रेल्वे उभारण्याचे कामही नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. ला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात आजवर ब-याच ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र, त्यासाठी लागणारा रोलिंग स्टॉक आयात करण्यात आला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना मांडली व महाराष्ट्राने ती स्वीकारली. सहा महिन्यांपूर्वी चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशनचे प्रतिनिधी आपल्या भेटीसाठी आले असता आपण त्यांच्यासमोर मेट्रो रेल्वेसाठी लागणारे रोलिंग स्टॉक नागपुरातच तयार करण्याची अट टाकली.
त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता नागपूर, महाराष्ट्रासह देशातील मेट्रो रेल्वेसाठी कोसेच मिळण्यास मदत होणार आहे. सीआरआरसी ही कंपनी नागपुरात मिहानमध्ये आपला उद्योग उभारणार असून १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ५ हजार युवकांना रोजगार मिळेल. रोलिंग स्टॉकसाठी देशात सर्वात कमी दर नागपूर मेट्रोला मिळाले आहेत, असे सांगत यामुळे देशात स्पर्धा निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. कामाची गुणवत्ता व स्पर्धेत टिकणारे दर दिले तर महाराष्ट्रात इतर ठिकाणीही आम्हाला मेट्रोचे काम दिले जाईल, असे त्यांनी चीनच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीनच्या कंपनीने येथे यावे यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराला आज यश आले, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. सामंजस्य करारावर राज्य सरकारतर्फे विकास आयुक्त (उद्योग) विजय सिंघल व सीआरआरसी तर्फे उपमहाव्यवस्थापक (ओव्हरसीज बिझनेस डिव्हिजन) झाऊ चुआनची यांनी तसेच एलओए वर एनएमआरसीएलतर्फे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग व सीआरआरसी तर्फे संचालक, (इंटरनॅशनल सिस्टीम एशिया अॅण्ड नॉर्थ अमेरिका डिपार्टमेंट) चेनचुंग टिंग यांनी स्वाक्षरी केली.