मुंबई : नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर झाला असून हा प्रकल्प २०१८ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याची माहिती नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.जर्मनीमधील केएफडब्ल्यू बँकेकडून या प्रकल्पाला अर्थसाहाय्य मिळणार आहे. ८ हजार ६८० कोटी रुपयांच्या या मेट्रो रेल्वे प्रकल्पापैकी ४ हजार ६०० कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून तर उरलेला निधी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. या प्रकल्पाकरिता ५०० दशलक्ष युरोचे कर्ज जर्मनीमधील केएफडब्ल्यू या बँकेकडून मिळणार आहे. उर्वरित रक्कम फ्रान्सच्या बँकेकडून उभी केली जाईल.मेट्रोसाठी ८७ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ६७ हेक्टर जमीन संपादित केली आहे. गेल्या सहा महिन्यांत दोन्ही कार डेपोकरिता लागणाऱ्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले. मेट्रो मार्ग ३५ कि.मी.चा असून त्यापैकी साडेचार कि.मी.चा मार्ग एलिव्हेटेड असेल, असे दीक्षित यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
नागपूर मेट्रो २०१८ पर्यंत धावणार
By admin | Published: October 17, 2015 2:47 AM