नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत नसली, तरी आमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंढेंनी केलं आहे.तुकाराम मुंढेंनी थोड्याच वेळापूर्वी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. आपण आयसोलेशनमध्ये असून नागपूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी घरातूनच काम करणार असल्याचं मुंढेंनी सांगितलं आहे. आपण जिंकू असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यातील एका अटेन्डंटची दोन दिवसांपूर्वी चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. यामुळे सोमवारी मुंढे यांच्या कुटुंबासह बंगल्यातील सात लोकांचे नमुने घेऊन मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात मुंढे यांचा नमुना पॉझिटिव्ह आला. तर इतर सहा लोकांचे नमुने निगेटिव्ह आले. त्यांच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकही पॉझिटिव्ह आल्याचे आता पुढे आले आहे. मुंढे यांना लो व्हायरस लोडमेयोने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्त मुंढे यांच्या ‘आरटी-पीसीआर’ चाचणीत ‘लो व्हायरस लोड’ असल्याचे निदान झाले. त्यांनी तातडीने तपासणी केल्याने आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत. यामुळे होम आयसोलेशनचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मुंढेंकडून विशेष पथकाची स्थापनाकोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि कोरोना बाधितांची लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथक स्थापन केलं आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेनं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. मनपाचं विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.