ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 24 : वाळू घाट व त्यावरून होणाऱ्या अवैध उपशावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ड्रोनचा उपयोग करण्यात आला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहे. वाळू चोरीच्या अनेक घटना पकडण्यात आल्या. ड्रोनचा हा नागपूर पॅटर्न आता लवकरच राज्यभरात राबविण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंबंधीचा अहवाल मागितला असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. यावर आळा घालणे प्रशासनासाठी मोठे अवघड आहे. वाळू चोरट्यावर कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांवर वाळू माफियांकडून जीवघेणे हल्ले झाले. यात काहींचा जीवही गेला. वाळू घाटांवर रोज लक्ष ठेवणेही प्रशासनासाठी शक्य नाही. शिवाय रात्रीच्या सुमारास घाटांच्या शेवटच्या टोकांपर्यंत लक्ष ठेवणे अवघड आहे. त्यामुळे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी वाळू घाटांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा प्रयोग केला.
हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. वाळू घाटांवर यंत्राच्या मदतीने वाळूचा उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. ड्रोनच्या अहवालावरून जिल्ह्यातील सात घाटांचे कंत्राट रद्द करून कंत्राटदारांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली. राष्ट्रीय हरित लवादात अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. ड्रोनच्या आधारे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अहवाल हरित लवादासमोर ठेवण्यात आला.
ड्रोनच्या यशस्वी प्रयोगामुळे इतर जिल्ह्यातही याचा वापर करण्यावर विचार सुरू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा प्रशासनकडून ड्रोनचा अहवाल मागविला आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवालही तयार करण्यात येत असून लवकरच तो मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे.