ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - मंगळवारी नागपुरात निघणा-या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. कोणत्या अधिका-याची, कर्मचा-याची कोणती जबाबदारी राहिल, ते सोमवारी निश्चित करण्यात आले. सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सोमवारी सकाळी सर्व पोलीस उपायुक्तांच्या उपस्थितीत रेशिमबाग मैदानावर संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना बंदोबस्तासंदर्भात निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावरून (रेशिमबाग ते कस्तुरचंद पार्क) रंगित तालिम (रिहर्सल) करण्यात आली. सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पोलिसांची ही रंगित तालिम पार पडली.
असा आहे बंदोबस्त-
पोलीस अधिकारी : १००
कर्मचारी : ८७५
व्हीडीओ कॅमेरे : २५
गर्दीत साध्या वेषातील पोलीस
पोलिसांच्या मदतीला आयोजकांकडून स्वयंसेवक
बॉम्ब शोधक व नाशक पथक सज्ज
शिघ्र कृती दल सज्ज
रेशिमबाग ते कस्तूरचंद पार्क : मोठ्या ईमारतीवरून निगराणी
अॅम्बुलन्स आणि फायर ब्रिगेडचीही व्यवस्था
---
वाहतूक व्यवस्था-
पोलीस अधिकारी : ३४
कर्मचारी : ३२१
पार्किंगची सोय : १९ ठिकाणी
वाहतूक वळविणार : ३६ ठिकाणांवरून
---
पोलिसांचे आवाहन-
दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. वाहने ठेवायला जागा नाहीत. अशात मोर्चेक-यांची मंगळवारी गर्दीत भर पडेल. त्यामुळे मोर्चात सहभागी होणा-या बाहेरगावच्या मंडळींनी आपापली वाहने नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच ठेवावीत. बाहेरगावून येणा-या मंडळींनी बाजारपेठा, रुग्णालयांच्या आजूबाजूच्या परिसरात वाहने आणून उभी करू नये. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची कुचंबना होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी आणि नागरिकांनी कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिका-यांनी केले आहे.
---