- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासन, केंद्र शासन आणि नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प यांच्या दरम्यान झालेल्या करारास कार्योत्तर मंजुरी आणि पुणे महानगर मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी राज्य, केंद्र आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यातील प्रस्तावित कराराच्या मसुद्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.पुणे आणि नागपूर शहरांतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांत वाढ होण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याबाबतचे करार संबंधित संस्थांशी करण्यात येत आहेत. राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४च्या निर्णयानुसार नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला मान्यता दिली होती. त्यानंतर केंद्र, राज्य, आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला. त्यास आज मंजुरी देण्यात आली.तसेच २३ डिसेंबर २०१६च्या निर्णयानुसार पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पास मंजुरी देण्यात आली असून, केंद्र शासनाने कळविल्यानुसार केंद्र, राज्य आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यातील त्रिपक्षीय कराराच्या मसुद्यास आज मंजुरी देण्यात आली. या कराराच्या अनुषंगाने येणारा खर्च महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन यांनी प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक, प्राधिकरण, शासकीय-निमशासकीय संस्था यांच्याकडील जमिनी घेऊन त्यांच्या विकासातून भागवायचा आहे.
नागपूर, पुणे मेट्रो सुसाट
By admin | Published: June 14, 2017 1:20 AM