ऑनलाइन लोकमतनरखेड, दि. 16 : तालुक्यातील गोमांस प्रकरणी गोरक्षकांनी मारहाण केलेल्या सलीम ईस्माईल शहा, रा. हत्तीखाना, काटोल यास जलालखेडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याला रविवारी दुपारी नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसााची अर्थात सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सलीम हा गोमांस नेत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांंनी त्याला भारसिंगी येथील बसस्टॉपजवळ अडविले आणि त्याच्या अॅक्टिव्हाची तपासणी केली. त्यात मांस ठेवले असल्याचे आढळून येताच तरुणांनी जलालखेडा पोलिसांना सूचना दिली. त्यातच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताना तरुणांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी घडली होती. सलीमवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारही करण्यात आले. पोलिसांनी सलीमकडून त्याची अॅक्टिव्हा व मांस जप्त केले. सदर मांस हे गाईचे नसून बैलाचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी हे मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या मांसाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, हे मांस गोवंशाचे असल्याचे त्या अहवालात नमूद केले होते. सलीमने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व गोवंश हत्याबंदी कायदा २०१५ कलम ५ (क) अन्वये गुन्हाही नोंदविला होता. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच जलालखेडा पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्री १२.२१ वाजता अटक केली आणि रविवार दुपारी नरखेड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याला सोमवारी (दि. १७) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सलीमला तारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बुधवारी रात्री अटक केली होती. त्या चौघांनाही न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली होती.
नागपूर : बीफ बाळगणाऱ्या सलीम शहाला अटक
By admin | Published: July 16, 2017 10:23 PM