नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यांत शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, आदी उपस्थित होते.नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामाची सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
१७ विश्रांती थांबे निश्चित नागपूर समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्यात या महामार्गाच्या दोन्ही बाजूंची १७ ठिकाणे विश्रांती थांबे म्हणून निश्चित झाले आहेत. नागपूरच्या दिशेने सात तर शिर्डीच्या दिशेने सहा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. कमीतकमी ५.८५ ते जास्तीतजास्त ८.७० हेक्टर जागा दिली जाईल. आमने, मारळ, मांडवा, वरदारी, शिवनी, मनकापूर, मार्ले आणि आमने या गावांजवळ हे भूखंड आहेत. या भूखंडांवर पेट्रोल पंप, फूड माॅल, आरोग्य केंद्र, आदी सुविधा उभाराव्या लागणार आहेत. भूखंडांचा हा विकास करण्यासाठी एमएसआरडीसी निविदा प्रसिद्ध केली आहे.
समृद्धी महामार्गावर उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर सकाळी ११.३० च्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले.
औरंगाबाद जिल्ह्यातही कामाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी नागपूरपासून औरंगाबादपर्यंत हेलिकॉप्टरमधून समृद्धी महामार्गाची पाहणी केली. दुपारी २ वाजता वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी कामाचा आढावा घेतला. त्यानंतर हेलिकॉप्टरकडे परतताना ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाचे अवलोकन केले. औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग जात आहे.