नागपूर – अलीकडेच वर्ध्यातील शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते आणि विदर्भाचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. बाहेरुन आलेल्यांना पक्षात संधी दिली जाते आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येते असा आरोप करत सावरबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. याबाबत शेखर सावरबांधे म्हणाले की, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे हा काळ पक्षवाढीचा असतो अशी अपेक्षा असते. परंतु गेल्या काही दिवसांत नवीन नवीन लोकांना पक्षात आणताना ज्यांनी याआधी कुठेही चांगले काम केले नाही अशांना पक्षात सामाविष्ट करण्यात आलं. आमच्या सहसंपर्क प्रमुख गजानन किर्तीकर यांनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नसावं असं त्यांच्या अर्भिभावावरून लक्षात येते. मग त्यांच्यासारख्या नेत्यांना डावललं जात असेल तर आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नाही. बाहेरुन आलेल्या पक्षांना पदं वाटप केली जात असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो. नुसतं पद घेऊन घरी बसणं अशी यंत्रणा पक्षात सुरु आहे त्यामुळे हे पक्षासाठी चांगले नाही त्यामुळे मी पक्षातून बाजू होण्याचं ठरवलं. याबाबत मी पक्षप्रमुखांना ईमेल करुन कळवलं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्या निर्णयामुळे इतर जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. जर माझ्या राजीनाम्यामुळे त्यांना न्याय मिळाला तर त्यात आनंद आहे. मी जिल्हाप्रमुख असताना अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले. मात्र आता पक्षासाठी ज्यांनी काम केले त्यांना डावलून इतरांना संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते नाउमेद होतात. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पार्टीकडे आकर्षित होत होते. भाजपातील अनेक जण शिवसेनेत आले. परंतु आता पूर्व विदर्भाकडे बारकाईनं संघटनेकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र तसं झालं नाही. माझी कुणाबद्दल तक्रार नाही. माझ्यासोबत कोणी पक्ष सोडावा असा कोणताही आग्रह कुणाला केला नाही असंही शेखर सावरबांधे यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत शेखर सावरबांधे?
गेल्या २० वर्षापासून शेखर सावरबांधे हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत. नागपूर महापालिकेत त्यांनी उपमहापौर म्हणून काम केलंय. विदर्भातील शिवसेनेतील मोठे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असला तरी ते अद्याप कुठल्या पक्षात जाणार याचा खुलासा झाला नाही.