कमलेश वानखेडे, नागपूर Maharashtra Election 2024: २०१९ च्या निवडणुकीत फक्त चार हजारांवर निकाल लागलेल्या दक्षिण नागपूर मतदारसंघात पुन्हा एकदा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जुनेच सरदार लढाईच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा गिरीश पांडव यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
मते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत, तर गिरीश पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील उजवे हात समजले जाणारे किरण पांडव यांचे बंधू त्यामुळे दक्षिणच्या राजकीय महाभारतात मते व पांडव यांच्यात काट्याची लढाई होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघावर भाजपचा दबदबा राहिला आहे.
कोहळेंचे कापले तिकीट, मतेंना संधी
२०१४ मध्ये भाजपचे सुधाकर कोहळे जायंट किलर ठरले. त्यांनी काँग्रेसचे बडे नेते सतीश चतुर्वेदी यांना तब्बल ४३ हजार २१४ मतांनी मात दिली. पण २०१९ मध्ये भाजपने कोहळे यांचे तिकीट कापले व मोहन मते यांच्यावर विश्वास दाखविला.
काँग्रेसने गिरीश पांडव यांना उतरविले. त्यांना नाराज कोहळे समर्थकांची पडद्यामागून साथ मिळाली. प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, सतीश होले या आघाडीच्या नेत्यांच्या बंडखोरीनंतरही 'टफ' फाईट झाली. मते हे फक्त ४०१३ मतांनी विजयी झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नागपुरात भाजप नेते नितीन गडकरी यांना २९ हजार ७१२ मतांची आघाडी मिळाली.
कोहळे समर्थकांची नाराजी थोपवण्याचे प्रयत्न
आता अखेरच्या क्षणी। भाजपने मास्टर कार्ड खेळत सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपुरात उमेदवारी दिली व कोहळे समर्थकांची नाराजी शमविण्याचा प्रयत्न केला. आघाडीत शिवसेनेच्या कोट्यात जात असलेली जागा कायम राखण्यसाठी काँग्रेस नेत्यांनीही मुंबई-दिल्लीत झुंज दिली.
शेवटी पुन्हा एकदा गिरीश पांडव यांनाच गेल्या वेळची उरलेली लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेससह मित्रपक्षातूनही कुणी बंडखोरी केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असल्याचे चित्र आहे.
बसपा व वंचितचा प्रभाव किती?
२०१४ मध्ये बसपाच्या सत्यभामा लोखंडे यांनी २३ हजार १५६ मते घेतली होती. या वेळी लोखंडे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. बसपाने संजय सोमकुवर यांना हत्तीवर स्वार केले आहे. २०१९ मध्ये बसपाचे शंकर थूल यांना ५६६८ तर वंचितचे रमेश पिसे यांना ५५८३ मते मिळाली होती. लोकसभेतही बसपाचे योगीराज लांजेवार यांना फक्त २८७२ मते मिळाली.