ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ - पोलीस कर्मचा-याच्या घरी शिरलेल्या चोरट्यांनी धाडसी चोरी करीत रोख आणि मौल्यवान चिजवस्तू लंपास केल्या. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी हवालदाराचा गणवेशही चोरून नेला. हुडकेश्वरमधील इंद्रनगरात २ ते ३ जुलै दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हेमंत संतोषराव राऊत (वय ५८) हे रेल्वे (लोहमार्ग) पोलीस दलात हवलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे उपचाराकरीता मुलाला घेऊन २ जुलैला ते मुलताई (मध्यप्रदेश) येथे गेले होते. ३ जुलैला ते उशिरा रात्री घरी परतले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडून घरात अक्षरश: धिंगाणा घातला होता. दोन्ही कपाट फोडून चोरट्यांनी आतमधून रोख ३० हजार, सोन्याचे दागिने, मोबाईल, टीव्ही तसेच त्यांचा गणवेशही (पोलिसांची वर्दी) चोरून नेल्याचे उघड झाले. त्यामुळे हादरलेल्या राऊत यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी सोमवारी दिवसभर शोध घेऊन चोरट्यांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांबाबत कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वेगळीच चिंता
चोरट्यांनी चक्क गणवेशही चोरून नेल्याने फिर्यादी राऊत यांच्यासह अवघ्या पोलीस दलाला चिंता पडली आहे. हा गणवेश घालून चोरटे गुन्हे करतात की काय, अशी पोलिसांना चिंता वाटत आहे.