नागपूर : विमान निर्माण उद्योगामध्ये नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.मिहानमधील टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनतर्फे ड्रीमलायनर ७८७-८ आणि १० बोर्इंग विमानांसाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बीमच्या पुरवठ्यासंदर्भातील कन्साईनमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेशनिवारी करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.या समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष देशमुख, अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, बोर्इंगच्या आशिया पॅसिफिक अॅण्ड इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) डॉ. दिनेश केसकर, डॉ. आर. ए. माशेलकर, बोर्इंग इंडिया लि.चे अध्यक्ष डॉ. प्रत्युशकुमार, ‘ताल’चे अध्यक्ष आर.एस. ठाकूर, कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, मुख्य कार्यान्वयन अधिकारी लोकेश श्रीवास्तव, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी गुंटर बट्सचेक आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ताल’ने उच्च दर्जाचे फ्लोअर बीम निर्माण करून मिहानचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविले आहे. दिनेश केसकर यांच्या प्रयत्नामुळेच एमआरओ आणि ‘ताल’ सुरू झाले. ‘ताल’ हे मिहानसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर ठरणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेत नागपूर हे ‘मेड फॉर वर्ल्ड’ झाले आहे.‘ताल’मध्ये कार्यरत ८० टक्के युवकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून फ्लोअर बीमचीनिर्मिती केली आहे. जागतिक स्तरावरील उत्पादनासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ नागपूरसह विदर्भात असल्यामुळे जागतिक स्तरावरील प्रवासी विमाने एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येत आहेत. यासंदर्भात स्पाईस जेटसोबत करार करण्यात आला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)
नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ होणार
By admin | Published: August 21, 2016 3:10 AM