चंदिगढ : नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेला फ्रान्स विविध प्रकारे तांत्रिक तज्ज्ञांचे सहकार्य देणार असून, यासाठी फ्रेंच सरकार व महाराष्ट्र सरकारमध्ये रविवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांचे येथे आगमन झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चंदिगडचा फेरफटका मारण्यापूर्वी दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत चंदिगड, नागपूर व पुद्दुचेरी या तीन शहरांच्या स्मार्ट सिटीसाठी फ्रान्सकडून तांत्रिक सहकार्य घेण्याबाबत करार झाले. मोदी फ्रान्सला गेले होते तेव्हाच ओलांद यांनी मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी फ्रान्स सरकारकडून २.२५ अब्ज डॉलरचे वित्तसाह्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.फ्रान्सचे भारतातील राजदूत फ्रँकॉई रिचियर यांनी १६ व १७ डिसेंबर रोजी नागपूरला भेट देऊन या सामंजस्य कराराची पृष्ठभूमी तयार केली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत स्मार्ट सिटी व नगरविकास या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य असलेल्या १४ फ्रेंच कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही होते. फ्रान्सची ‘एजन्से फ्रॅकाईस डी डेव्हलपमेंट’ ही संस्था या तीन शहरांच्या स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा, मलनि:सारण, नागरी परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रांत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल.
फ्रान्स करणार नागपूर स्मार्ट
By admin | Published: January 25, 2016 3:10 AM