...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:55 IST2024-12-19T15:54:58+5:302024-12-19T15:55:46+5:30
बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती असा आरोप मारकडवाडी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला.

...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर - निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, लोकशाहीचा विजय आणि निकाल विरोधात गेला लोकशाहीचा खून, ईव्हीएम घोटाळा असं बोलले जाते. जे संविधान आपण हातात घेऊन फिरतो त्याचा विश्वासघात तुम्ही करताय. एक प्रकारे संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्यात त्यावर अविश्वास व्यक्त केला जातो. स्वायत्त संस्थांविरोधात लोकांमध्ये जनमत तयार करणे हा खरा राजद्रोह आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आज आपण रोज असं काम करतोय हे योग्य नाही. समसमान मते पडणे हे पहिल्यांदाच घडलंय का, २०१२ पासून अनेकांना सारखी मते पडली आहेत. २०१४ च्या निवडणुकीतही अनेक उमेदवारांना समान मते पडली आहेत. आपल्या मनाचं समाधान करून घेण्यासाठी असे आरोप केले जातात असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभेत EVM वरील विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या देशात २०१२ पर्यंत EVM होते, त्यानंतर EVM नव्हे तर VVPAT आलंय. आपण प्रत्येकजण मतदानाला जातो, त्यानंतर कोणाला मत दिले हे चिन्ह VVPAT मध्ये दिसते. ते बॅलेट बॉक्समध्ये जाते. ईव्हीएम मतमोजणीसोबतच VVPAT मतमोजणी केली जाते. ही दोन्ही मतदान जुळले तरच निकाल जाहीर केला जातो. आता ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवरील VVPAT आहेत. त्यामुळे EVM, EVM हे Every Vote for Maharashtra हे मतदान महाराष्ट्राने आम्हाला दिले आहे. जे अभूतपूर्व बहुमत आम्हाला मिळाले त्यावरही फेक नरेटिव्ह पसरवायला सुरूवात केली. अतिरिक्त ७४ लाख मते कुठून आली असा प्रश्न केला. तुमची फेक नरेटिव्ह फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथं उभा आहे. महाराष्ट्रात १ लाख बूथ आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक आयोग जाहीर करते. ५८.२२ टक्के मतदान होते, ५ नंतर झालेले मतदानाची आकडेवारी दुसऱ्या दिवशी जाहीर केली जाते. हे आता नाही आधीपासून करते. जनतेने जाऊन महायुतीला मतदान केले आणि आम्हाला निवडून दिले असं त्यांनी सांगितले.
तसेच फेक नरेटिव्ह फॅक्टरीत मारकडवाडी आणली. मला शरद पवारांचे आश्चर्य वाटते. काँग्रेसने याआधी EVM चा मुद्दा मानला. शरद पवारांनी पहिल्यांदाच EVM वर भाष्य केले. छोटी राज्ये आम्हाला देतात आणि मोठी राज्ये हे जिंकतात असं पवार म्हणाले. मारकडवाडी येथे जे उमेदवार पवार गटाचे निवडून आले त्यांना ८४३ मते आहेत आणि राम सातपुतेंना १००३ मते आहेत. त्याच मारकडवाडीत २०१४ साली सदाभाऊ खोतांना ६६४ मते आणि मोहिते पाटलांना ५३१ मते आहेत. २०१९ ची लोकसभा बघा, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मारकडवाडीत ९५६ मते आहेत राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मते आहेत. माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे. मारकडवाडीत राम सातपुतेसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ५ वर्ष राबतो आणि २२ कोटींची कामे करतो. त्याला जास्त मते मिळाल्यानंतर तुम्ही लोकांना धमकवता त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. आपल्याला बॅलेट मतदान घ्यायचे आहे. त्यात मत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पाहिजे. बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती. लोकशाहीत अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ही कुठली लोकशाही..? असा परखड सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है नारा दिला. समाज एकसघं राहिला तर आपण पुढे जाऊ त्याला महाराष्ट्राने प्रतिसाद दिला त्यातून मोठा विजय महायुतीला प्राप्त झाला. गेली ५ वर्ष महाराष्ट्राकरता संक्रमणाची होती. ज्याप्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले ते महाराष्ट्राच्या इतक्या वर्षाच्या संस्कृतीत कुणी अनुभवले नव्हते. २०१९ ते २०२४ व्यक्तिगत मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आले हा कदाचित रेकॉर्ड असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोक एकाच व्यक्तीवर बोलत होते. त्या लोकांनी जे वातावरण खराब केले. मला टार्गेट केले त्यातून राज्यातील जनतेत माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. ५ वर्ष जाती धर्माचा विचार न करता मुख्यमंत्री म्हणून मी काम केले होते हे जनतेने पाहिले होते. या निवडणुकीने हे दाखवले. गेल्या ३० वर्षाच्या निवडणुकीत कुणालाही ५० टक्के मते मिळाली नाहीत तेवढी मते महायुतीला मिळाली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.