उद्यापासून ट्रीपल इंजिन सरकारशी विरोधकांचा लढा; हिवाळी अधिवेशनात खडाजंगीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 08:55 AM2023-12-06T08:55:04+5:302023-12-06T08:55:29+5:30
अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बुधवारी विरोधकांची बैठक आहे
कमलेश वानखेडे
नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानच्या यशामुळे उत्साह वाढलेल्या ट्रीपल इंजिन सरकारचा उद्या, गुरुवारपासून मनोबल खचलेल्या विरोधकांशी सामना होणार आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, अवकाळी पावसामुळे नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीवरून सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, तर ‘निकाला’चे अस्त्र समोर करून सत्ताधारी विरोधी धार बोथट करण्याचा प्रयत्न करतील. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीवर विधिमंडळात चर्चा होणार असून, सरकारकडून तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरील चर्चेत सभागृहात खडाजंगी होण्याचे संकेत आहेत.
चहापानावर विरोधक टाकणार बहिष्कार?
अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बुधवारी विरोधकांची बैठक आहे, तर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बंगल्यावर चहापान आयोजित केला आहे. सरकार हुकूमशाही कारभार करत असल्याचे सांगत विरोधक चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.