नागपूर - विदर्भात नागपूर अधिवेशनात आपण कशाला आलोय, जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे. सरकार आहे परंतु विरोधी पक्षाचे आमदारही त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे असा संदेश लोकांपर्यंत पोहचला पाहिजे नागपूरमध्ये लंडनसारखं वातवरण आहे. काही जण आनंद, पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे राहिले नाही असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता खोचक टोला लगावला.
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, परभणी, बीड, कल्याण असो हे राज्य कायद्याचे आहे. इथं न्याय होणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर विधानसभेत दिले. गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. मी मविआ सरकारमध्ये मंत्री होतो. मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव सुरू होता. मविआचा कारभार कसा चालत होता हे अंबादास यांना कल्पना आहे पण त्यांना बोलता येत नाही. सध्या अंबादास तुम लढो मै खोके लेके घर जाता हूँ असा कारभार आहे. विधानसभेत मिळालेलं यश हे अनपेक्षित, आम्हालाही वाटलं नव्हते. ईव्हीएम घोटाळा नाही तर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. विरोधकांनी खोटेनाटे आरोप न करता जनतेचे प्रश्न सभागृहात मांडाल ही अपेक्षा होती. सभागृहात कमी परंतु माध्यमांसमोर बोलण्यात विरोधकांनी धन्यता मांडली. आरोपाला आरोपाने नव्हे कामातून उत्तर देऊ. निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले घरी जनतेला काम करणारे लोक आवडतात. घरी बसणाऱ्यांना घरी बसवतात असं त्यांनी म्हटलं.
तसेच प्रकल्पांना विलंब झाला हे कुणामुळे याचा विचार विरोधकांनी करावा. विकासकामांना स्पीड ब्रेकर लावणारे, योजना बंद पाडणारे कोण याचेही उत्तर शोधावे. आम्ही गेल्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड सुरू झाले. २० योजनांना आम्ही चालना दिली त्याची पोचपावती जनतेने दिली. इतक्या वेगाने निर्णय, कल्याणकारी योजना आम्ही आणल्या. ५-१० वर्षाचं काम आम्ही अडीच वर्षात करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे गृहमंत्री होते, वसुली प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावे लागले. उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवण्यात आले. पालघर साधुची हत्या झाली. बॉम्बस्फोटातील आरोपीच्या कबरीचं उदात्तीकरण करण्यात आले. मविआ काळात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला गेला. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. प्रवीण दरेकरांनी दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. फडणवीस आणि मला अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळच्या सरकारच्या प्रमुखांनी कसा गैरवापर केला. कारस्थाने केली हे मला वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का...? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला.
दरम्यान, महाराष्ट्रात ज्यानं माज केला तो उतरवलाच पाहिजे हे काम सरकार करेल. चुकीला माफी नाही. या राज्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आयाबहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला माफी नाही, कुणालाही सोडणार नाही हे सरकारचं धोरण आहे. स्वार्थी राजकारणासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करू नये. सत्ताधारी-विरोधी पक्ष लोकशाहीची चाके आहेत. राज्यात सर्वधर्मीय, सर्व समाज राहतात त्यांच्यात तेढ निर्माण करू नका हे माझं आवाहन आहे. मविआ काळात औद्योगिक गुंतवणुकीत तिसऱ्या नंबरवर होता. आमच्या काळात पुन्हा महाराष्ट्रात नंबर वन आला आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के महाराष्ट्रात आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातून उद्योग पळाले असं फेक नेरिटिव्ह विरोधकांनी पसरवलं. मी पुराव्यानिशी बोलेन. जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका उद्योग खात्याने काढली. श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते. एक महामार्ग इको सिस्टिम तयार करतो. समृद्धी महामार्गामुळे आसपासच्या भागात कंपन्या उभ्या राहतायेत. चांगल्याला चांगले म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण खोटेनाटे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करू नका असं आवाहन एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केले.