नागपूर: विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या (7 डिसेंबर) पासून नागपूर इथे होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. या चहापानच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी आरक्षणावर भाष्य केले.
यावेळी मराठा आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. दसरा मेळाव्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपत घेतली होती. आमची ओबीसी समाजासोबत बैठक झाली, त्यांनाही सांगितलंय की, तुम्ही चिंता करू नका.'
ते पुढे म्हणतात, 'शिंदे कमिटी त्यांचे काम करत आहे. मराठा आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. इतर समाजांनी घाबरण्याचे काम नाही. आमची सत्ताधारी आणि विरोदी नेत्यांसोबत बैठक झाली आहे. आरक्षणासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. मराठा समाजाने आमच्यावर विश्वास ठेवावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा आरक्षण मिळाले होते. पण, मागच्या सरकारच्या चुकामुळे सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. आता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही कोर्टात टीकणारे आरक्षण देणार,' अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी यावेळी मांडली.
'विरोधकांसाठी आता सुपारी-पान ठेवू' सरकारने आयोजित केलेल्या चहा पानावर विरोधकांनी बहिष्टार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणे घेणे नाही, हे त्यांच्या भूमिकेवरून दिसते. विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले. आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पण ठेवावे लागेल, म्हणजे कदाचित ते येतील,' असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.