Nagpur ZP Election Results: काँग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीला दोन जागांवर मानावं लागलं समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:46 PM2021-10-06T14:46:32+5:302021-10-06T14:47:30+5:30
जिल्हा परिषदेत पोटनिवडणुकीनंतरही काँग्रेसचाच वरचष्मा. भाजपाच्या विरोधी पक्षनेत्याचा पराभव.
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने ९ जागा जिंकून चांगलीच मुसंडी मारली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला दोनवरच जागांवर समाधान मानावे लागले. विरोधीपक्ष नेत्याचा पराभवाबरोबरच भाजपाला एका जागेचा फटका बसला. जिल्ह्यात काँग्रेसमय वातावरण असतानाही, रामटेकमध्ये शिवसेनेच्या आशिष जैस्वाल यांनी जोर लावल्यानंतरही गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उदय झाला.
५८ सदस्य असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या २०२० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे ३० उमेदवार विजयी झाले होते. पण ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य निवडणुक आयोगाने १६ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यात काँग्रेसच्या ७ सदस्यांना फटका बसला. या १६ ही जागा खुल्या प्रवर्गात मोडून पोट निवडणुक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत काँग्रेसने ७ जागा कायम ठेवून अतिरिक्त दोन जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले. या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असली तरी राष्ट्रवादीला आपल्या ४ जागा कायम ठेवता आल्या नाही.
राष्ट्रवादीचा गड असलेल्या काटोल आणि नरखेडातून राष्ट्रवादीला २ जागांचा फटका बसला. भाजपाला कामठीत चांगल्याच कानपिचक्या बसल्या. चक्क भाजपाच्या विरोधीपक्ष नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला. सोबतच सदस्यत्व रद्द झालेले तीन सिटींग सदस्यही गमवावे लागले. काटोल नरखेडमध्ये भाजपाने खाते उघडले असले तरी, भाजपाच्या हक्काच्या कामठी विधानसभेत भाजपाला फटका बसला. रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा सर्कलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षाचे उमेदवार असतानाही येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीने सर्वांना पालथे टाकून जिल्हा परिषदेत पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध केले.
जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार
सर्कल उमेदवार पक्ष
सावरगाव पार्वती गुणवंत काळबांडे भाजपा
भिष्णूर प्रवीण रामभाऊ जोध राष्ट्रवादी
येनवा समीर शंकरराव उमप शेकाप
पारडसिंगा मिनाक्षी संदीप सरोदे भाजप
वाकोडी ज्योती शिरसकर काँग्रेस
केळवद सुमित्रा मनोहर कुंभारे काँग्रेस
करंभाड अर्चना दीपक भोयर काँग्रेस
बोथिया पालोरा हरिचंद गुलाब उईके गोगपा
गुमथळा दिनेश बबनराव ढोले काँग्रेस
वडोदा अवंतिका रमेश लेकुरवाळे काँग्रेस
अरोली योगेश नागोराव देशमुख काँग्रेस
गोधनी रेल्वे कुंदा श्यामराव राऊत काँग्रेस
निलडोह संजय रामकृष्णा जगताप काँग्रेस
डिगडोह रश्मी धनराज कोटगुले राष्ट्रवादी
इसासनी अर्चना कैलास गिरी भाजपा
राजोला अरुण हटवार काँग्रेस
पोट निवडणुकीतील पक्षीय बलाबल
काँग्रेस - ९
भाजप - ३
राष्ट्रवादी - २
शेकाप - १
गोंगपा- १
पोट निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस - ३३
भाजप - १४
राष्ट्रवादी - ८
शिवसेना - १
शेकाप - १
गोगपा - १