ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. १४ - नागपुरात 'हाफ चड्डीवाले नव्हे तर फुल दिमाग'वाले आहेत अशी टीका जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषणादरम्यान कन्हैय्या कुमारने ही टीका केली आहे.
14 एप्रिलला जाणुनबुजून नागपुरात आलो. संदेश द्यायला नाही तर संदेश घ्यायला आहे. नागपुरकरांकडे दिक्षाभूमी आहे, तुम्ही नशिबवान आहात. ज्याप्रमाणे गुजरात मोदींचा नाही गांधींचा आहे त्याप्रमाणे नागूपर आरएसएसचा नाही आंबेडकरांचा आहे असंही कन्हैय्या कुमार बोलला आहे. 'भारत माता की जय' बोलण्यावरुन सुरु असलेल्या वादावरही कन्हैय्या कुमारने भाष्य केलं. 'भारत माता की जय'चा अर्थ जर कोणी व्यवस्थित सांगितला असेल तर तो आंबेडकरांनी, महिलांची प्रगती हा देशाचा विकास दर्शवतो. नुसता आश्वासनांवर देश चालत नाही तुमच्याकडे दृष्टी असण्याची गरज असल्याचंही कन्हैय्या कुमार बोलला आहे.
जेएनयू कोणत्याही देशविरोधी घटनेचं समर्थन करत नाही, माझ्याविरोधात षडयंत्र रचून बदनाम करण्याचा प्रयत्न कऱण्यात आल्याचा आरोप कन्हैय्या कुमारने यावेळी बोलताना केला आहे. एक चहावाला पंतप्रधान बनला पण चहावाल्याच्या मुलाचा विचार करत नाही. मोदी देश नाही आहे, आरएसएस संसद नाही. देशात सध्या हिंदुस्थान विरुद्ध संघिस्थान असा सामना सुरु आहे. सत्ता परिवर्तनाची नाही तर समाज परिवर्तनासाठी लढाई आहे. आम्ही मोदी किंवा संघाविरोधात नाही, मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी एकही आश्वासन पाळलेलं नसल्याचं कन्हैय्या कुमार बोलला आहे.
रथयात्रा निघते, मग देशातील गरिबी संपवणारी यात्रा का निघत नाही? देशापासून नाही तर देशात स्वातंत्र्य हवं आहे असं कन्हैय्या कुमारने म्हंटलं आहे. दरम्यान कन्हैय्या कुमारने भाषण सुरु करण्याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय' घोषणा देत कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढल्यावर कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम पुन्हा सुरु झाल्यानंतर कन्हैय्या कुमारने भाषणाला सुरुवात करताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने कन्हैय्यावर चप्पल भिरकावली. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं.