नवी मुंबई : ‘विद्यमान परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून विकासाचा अजेंडा राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन विकासाच्या विचारधारेला चालना देणाऱ्या सक्षम पर्यायावर विचार करा,’ असा आग्रह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे धरला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आज वाशीत एक बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली.लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही नाईकांच्या बालेकिल्ल्याला मोदी फॅक्टरचा फटका बसला. लोकसभेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक तर विधानसभेत स्वत: त्यांनाच पराभव स्वीकारावा लागला. हे दोन्ही पराभव कार्यकर्त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. तसेच महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेणे गरजेचे आहे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्याअनुषंगाने नाईक समर्थकांनी वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आज एक बैठक बोलाविली होती. बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक किशोर पाटकर, सभागृह नेते अनंत सुतार यांनी आपली मते मांडली. संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांची मते गणेश नाईक यांच्यापर्यंत पोहोचविली जातील, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
नाईक यांनी पक्ष सोडावा
By admin | Published: December 05, 2014 3:53 AM