एस. के. गुप्ता
नवी दिल्ली/पुणे : एमबीबीएस व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ६६ हजार जागांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नीट परीक्षेत राजस्थानमधील नलिन खंडेलवाल देशात प्रथम आला आहे तर मुलींमध्ये तेलंगणची माधुरी रेड्डी पहिली आली. महाराष्ट्रात नाशिकचा सार्थक भट याने पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातून मुलींमध्ये अकोल्याची दिशा अगरवाल पहिली आली. सांगलीच्या साईराज माने याने राज्यात दुसरा तर देशात ३४ वा आणि पुण्याच्या सिद्धांत दाते याने राज्यात तिसरा आणि देशात ५० वा क्रमांक पटकावला.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या नीट परीक्षेचा बुधवारी निकाल जाहीर झाला. सार्थकने देशपातळीवर सहावा क्रमांक पटकाविला आहे. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी सांगितले की, एनटीएतर्फे पहिल्यांदाच नीट परीक्षा घेतल्या. आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार परीक्षा २० मे रोजी झाली. तिचा निकाल एक महिन्यानंतर जाहीर झाला. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना प्रवेश प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या राखीव जागांचा लाभ घेता येईल.या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय, दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या कौन्सिलिंगच्या नोंदणीच्या वेळी किंवा कौन्सिंगच्यावेळी सादर केले पाहिजे.
यशाचे गमकगेली दोन वर्ष मी कसून तयारी करत होतो. दररोज सात ते आठ तास अभ्यास करायचो. सोशल मीडिया व स्मार्टफोन या गोष्टींपासून दूर राहाणेच पसंत केले होते. - नलिन खंडेलवाल, राजस्थान 720 पैकी । ७०१ गुण
एनसीईआरटीच्या पुस्तकांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ती वारंवार वाचली पाहिजेत. अशा अभ्यासामुळेच उत्तम गुण मिळतात.- सार्थक भट, नाशिक 720 पैकी । ६९५ गुण
बारावीसोबतच ‘नीट’साठी रोज तीन तासांचा वेळ दिला. ग्रुप स्टडीऐवजी सेल्फ स्टडीवर लक्ष केंद्रित केले. मेमरी चार्ट, फॉल्ट बुकवर लक्ष केंद्रित केले. - दिशा अग्रवाल, अकोला 720 पैकी । ६८५ गुण