वसंत भोईर,वाडा- तालुक्यातील बुधावली ग्रामपंचायत हद्दीतील काटी या गावाच्या नळपाणी योजनेचे काम गेली दहा वर्षे अपूर्णच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरुच आहे. येथे ‘भारत निर्माण वर्धित वेग’ या योजनेतून वर्ष २००७ - २००८ मध्ये नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यासाठी १५ लाख ८१ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन ग्रामपंचायत पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचे काम हाती घेतले होते. विहीर, पाण्याची टाकी, पंप हाऊस व काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असून उर्वरीत कामे गेली दहा वर्षानंतरही अपूर्ण आहेत. झालेल्या कामासाठी ११ लाख ८६ हजारांचा खर्च करण्यात आला असतांनाही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्यापही उतरलेला नाही. योजना वापरात नसल्याने पाईपलाईन खराब झाली आहे तसेच पाण्याच्या टाकीचीही दुरवस्था झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी याबाबत वाडा पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करून तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. परंतू त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. >या पाणी योजनेबाबत नुकतीच सुनावणी घेण्यात आली असून संबंधितांना ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिचे काम लवकर पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात येईल. - पी. एस .कुलकर्णी, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग वाडा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष संजय पाटील व सचिव सुनिता हरड यांना योजना पूर्ण करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात दिल्या होत्या. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. - पूनम दोंदे, ग्रामसेविका, बुधावली ग्रामपंचायत
नळपाणी योजनेचे काम १० वर्षांनंतरही अपूर्णच!
By admin | Published: April 06, 2017 3:21 AM