पुणे : ज्या राजवटीत समाजाची अवहेलना, दुसऱ्या समाजावर अतिक्रमण झाले आहे, त्या राजवटीच्या खुणा, इतिहास पुसण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या काही नवीन नाहीत. औरंगाबादचे नामकरण करताना धार्मिक तेढ निर्माण होऊ द्यायची नसेल तर सर्व धर्मांच्या साहित्याचा अभ्यास करणारा, औरंगजेबाचा भाऊ दाराशुकोहचे नाव औरंगाबादला द्यावे, अशी सूचना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसंदर्भात डॉ. मोरे सोमवारी साहित्य परिषदेत आले होते. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ औरंगाबादचे नाव बदलून त्याचे संभाजीनगर करावे, अशी मागणी पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, ज्या सत्तेकडून धार्मिक, सामाजिक अतिक्रमणे होतात त्या सत्तेचा इतिहास पुसला जाण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. ब्रिटिश काळातील अशाच घटना कालांतराने पुसण्यात आल्या आहेत. दिल्लीतील नामांतराशी धार्मिक संबंध दिसत नाही. औरंगजेब मोठा बादशहा होऊन गेला. त्याच्या राज्यकारभाराचा अनेकांना त्रास झाला. त्याच्या राजवटीचा मुस्लिमांनाही त्रास झाला. सहिष्णुताशून्य असेच त्या राजाचे वर्णन करावे लागेल.सध्याच्या स्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केल्यास धार्मिकतेचा संशय येईल. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून संभाजीनगरचे नामकरण करून दाराशुकोहचे नाव द्यावे. अनेक धर्मग्रंथांचा त्याचा अभ्यास होता. औरंगजेबाने त्याची हत्या करून त्याचे शीर वडिलांना भेट दिले होते. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पत्रातही दाराशुकोहचा उल्लेख आहे. औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात शिवाजीमहाराजांनी म्हटले आहे की, दाराशुकोह राज्यकारभार करीत असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे त्यांनी नमूद केले.
औरंगाबादचे नामकरण दाराशुकोह करा
By admin | Published: September 01, 2015 1:54 AM