ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सुरू झालेली नावं बदलण्याची पद्धत कायम राहण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपा आमदार राज पुरोहित यांनी ‘गेटवे ऑफ इंडिया’चं नाव बदलून ‘भारतद्वार’ करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील कुलाब्याचे भाजप आमदार राज पुरोहित यांनी शनिवारी नाव बदलण्याची मागणी केली. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला पत्र लिहून गेटवे ऑफ इंडियाचे नाव बदलून भारतद्वार करण्याची विनंती करणार असल्याचं पुरोहित म्हणाले. ब्रिटिशांनी या शहराचे नाव बॉम्बे ठेवले होते. ते मुंबई करण्यात आले. पारतंत्र्यात असताना ठेवण्यात आलेले हे नाव आता बदलले पाहिजे, त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाचे नाव बदलून भारतद्वार करावे, असे ते म्हणाले.
राज पुरोहित यांनी यापुर्वीही नावं बदलण्याची मागणी केली होती. ब्रिटिश राजवटीच्या काळात ठेवण्यात आलेली सर्व नावे बदलण्याची ते सातत्याने मागणी करत असताना दिसतात. यापूर्वी मरीन लाइन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबादेवी करण्याची मागणी केली होती.
यापुर्वीही राज्यातील अनेक ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. मुंबईतील सीएसटी स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर प्रिन्स ऑफ वेल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात आले आहे.