लातूर - लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाची देशातील १८४ उमेदवारांची यादी घोषित झाली. त्यात पान क्रमांक ३ वर लातूर (राखीव) श्री सुधाकर भालेराव शृंगारे असे लिहले आहे. पण सुधाकर शृंगारे यांच्या वडिलांचे नाव तुकाराम आहे. मात्र यादीत सुधाकर भालेराव शृंगारे लिहले आहे. विशेष म्हणजे सुधाकर भालेराव हे उदगीर येथील भाजपाचे आमदार असून तेही प्रबळ दावेदार होते. परिणामी सुधाकर भालेराव की सुधाकर शृंगारे असा प्रश्न काहीवेळ निर्माण झाला. परंतु सुधाकर शृंगारे यांचेच नाव असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना आज भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावासोबत नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी अशा दिग्गज भाजपा नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्याचं पाहायला मिळालं, नागपूरमधून नितीन गडकरी, रावेरमधून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे, जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे, चंद्रपूर येथून हंसराज अहिर, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे, भिवंडीतून कपिल पाटील, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, मुंबई पश्चिम मध्य मुंबईतून पूनम महाजन, वर्धा येथून रामदास तडस, चिमूरमधून अशोक नेते, सांगली येथून संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे.