भंडारा : विवाहाच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचा पाचवेळा सौदा केल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.शिल्पा मेश्राम, कार्तिक मेश्राम, प्रकाश मस्के, ललिता, विनोद गायधने, विजय सिंघल, समाधान पाटील, संजय ऊर्फ दीपक महाजन, किरण समरीत, विनोद ऊर्फ बाबा मेहर, छोटेलाल पटले, चैनलाल पटले, विनोद वैद्य अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी शिल्पा मेश्रामशी जिल्हा रूग्णालयात आपली ओळख झाली. याच ओळखीचा फायदा घेत शिल्पाने आपल्याला लाखनी येथे नेल्याचे पीडित मुलीने या तक्रारीत म्हटले आहे. १३ सप्टेंबर २०१६ ते २३ सप्टेंबर २०१७ या कालावधीत शिल्पा आणि तिच्या साथीदारांनी पीडित मुलीचा पाच वेगवेगळ्या ठिकाणी सौदा करून लग्न लावून दिले. ज्या लोकांशी तिचा विवाह करून दिला होता, त्यांनी तिचे शारीरिक शोषण केले. याशिवाय शिल्पा आणि कार्तिक मेश्राम या दोघांनी तिला दारू पाजून व नशेच्या गोळ्या देऊन इतरांकडूनही पैसे घेत तिचे वारंवार लैंगिक शोषणही करवले, अशी तक्रार पीडित मुलीने आईसह नोंदविली आहे.पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी भादंवि ३६३, ३६६ (अ), ३७२, ३७६, (आय), (जे), (के), (एन) व ३४ तथा बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.आतापर्यंत केलेल्या कारवाईत या अल्पवयीन मुलीला जळगाव, राजस्थान राज्यातील जोधपूर आरी, बाडमेर आणि नवी दिल्लीसह अनेक ठिकाणी विकण्यात आले होते. आरोपींकडून केलेल्या शारीरिक शोषणामुळे पीडिता गर्भवती आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याचे भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी सांगितले.
विवाहाच्या नावाखाली मुलीचा पाच वेळा सौदा, १५ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 5:17 AM