वडगाव निंबाळकर (पुणे) : खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीच्या पालकाला १४ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात येथे गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून इतर चार आरोपी फरार आहेत.डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वैभव विजय कांबळे, शिक्षक विवेक वसंत देशपांडे व सीमा बिपीन पवार, पवन व्ही. जोशी, सुषमा नागवेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी विवेक देशपांडे याला पोलीस कोठडी मिळाली आहे.सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ साली डॉ. सोनवणे यांची मुलगी प्रीती ही बारावी विज्ञान शाखेत ७८ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली होती. दौंड येथील वैभव कांबळे महाराज हे ज्योतिषतज्ञ असून ते वैद्यकीय प्रवेशाची कामे कमी खर्चात करून देतात, अशी माहिती मिळाल्याने सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली. एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगत कांबळे यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी डॉ. सोनवणे यांच्याकडून १५लाख २५ हजारांची मागणी केली. त्यापैकी १४ लाख ७० हजार रुपये सोनवणे यांनी दिले होते. परंतु प्रवेशाचे काम न झाल्याने त्यांनी पैशाची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. (वार्ताहर)
वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली गंडा
By admin | Published: October 31, 2016 4:53 AM