पुणे : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत कुर्बान हुसेन यांचा करण्यात आलेल्या उल्लेख चुकीचा नाही. तेही एक क्रांतीकारक होते. तसेच सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आल्याने त्यांचे नाव वगळले म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण बालभारतीचे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी दिले आहे.इयत्ता आठवीच्या पुस्तकातील ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या धड्यामध्ये ‘भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते,’ असा उल्लेख आहे. यामध्ये सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन यांच्या नाव जोडण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. बालभारतीने सुखदेव यांना वगळल्याचा आरोप केला जात आहे. याअनुषंगाने गोसावी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे बालभारतीची भुमिका स्पष्ट केली आहे. ‘हा धडा साहित्यिक यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. धड्यामध्ये क्रांतिकारकांबाबतची माहिती अभिप्रेत नाही. देशप्रेम भावना जाणीवजागृती याबाबत वर्गातील विद्यार्थ्यांशी झालेली आंतरक्रिया लेखकाने मांडलेली आहे. ती मुळ पुस्तकातून आहे तशी घेण्यात आली आहे. त्यामुळे कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख चुकीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. भाषा विषय पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात पाठ्यपुस्तकांमधील पाठ, कविता या मराठी भाषा विषय समिती व अभ्यासगटाकडून निवडण्यात येतात. त्यासाठी संबंधित भाषा विषयातील नामवंत साहित्यिक, लेख व कमी यांचे साहित्य हे अभ्यासक्रमाची गरज, उद्दिष्टे अभ्यासून तसेच साहित्याची योग्य ती पडताळणी करून विचारात घेतले जाते. मूळ साहित्यामध्ये व त्यातील आशयामध्ये बदल करण्याचा अधिकारी समितीस नसतो’, असे प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.‘कुर्बान हुसेन हे सोलापुर मधील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना दि. १२ जानेवारी १९३१ रोजी सहकाºयांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते सर्वपरिचित आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सोलापुर जिल्हा संकेतस्थळावरही देण्यात आली आहे. इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातील धडा क्रमांक ८ मध्ये सोलापुर सत्याग्रहाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे कार्य नमुद करण्यात आले आहे. याचबरोबर धडा क्रमांक १० मध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक मंडळाने सुखदेव यांचे नाव वगळले, ही बाब खरी नाही,’ असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.-----------
आठवीच्या पुस्तकातून क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव वगळले नाही; बालभारतीचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 7:51 PM
इयत्ता आठवीच्या पुस्तकात भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, असा उल्लेख आढळल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.
ठळक मुद्दे बालभारतीने सुखदेव यांना वगळल्याचा केला जात आहे आरोप