मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचं काम संथ गतीने सुरू असले तरी त्याची नामकरणासाठी नवीन सरकारकडून गती देण्यात येत आहे. या द्रुतगती मार्गाच्या नामकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे.
या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत नवीन सरकारने मुंबई ते नागपूर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग नाव देण्याचा निर्णय़ घेतला आहे. याची केवळ घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आधीच्या सरकारच्या काळातच समृद्धी महामार्गालाबाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरून वाद नको, याचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव या द्रुतगती मार्गाला देण्यात येईल, याची शक्यता मावळली होती.
दरम्यान मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेची समृद्धी महामार्गाच्या नामकरणाची मागणी मान्य होणे आता अवघड नव्हते. त्यामुळे हा निर्णय सहजतेने झाल्याचे समजते.