सांगली : दिल्लीत नव्याने बांधल्या जात असलेल्या संसद भवनाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्याची मागणी लिंगायत धर्म संघटनेतर्फे करण्यात आली.
पत्रकार बैठकीत प्रदीप वाले यांनी सांगितले की, यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. लिंगायतांमधील काही जातींचा ओबीसींमध्ये समावेश आहे; पण हिंदू-लिंगायत अशी नोंद असणारे मात्र ओबीसींमध्ये नाहीत. हा अन्याय दूर झाला पाहिजे, यासाठी ओबीसी बहुजन परिषदेच्या नेतृत्वाखाली सांगलीत शनिवारच्या मेळाव्यात लिंगायत बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आदी जिल्ह्यांतील लिंगायतांचा भव्य मेळावा लवकरच घेणार आहेत.
ओबीसी नेते कल्याणराव दळे म्हणाले, ओबीसींच्या बाजूने असल्याचे पक्ष दाखवितात, पण सर्वांनी फक्त वापर करून घेतला आहे. आज राजकीय आरक्षण गेले, उद्या शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणही जाईल. ओबीसी रस्त्यावर येतील. याला तोंड देण्यासाठीच ओबीसी आक्रमक झाला आहे. राजकारण्यांनी धोका दिला, तर तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणाची अवस्था होईल. राजकीय पक्ष्यांचे सेल फक्त आम्हाला वापरून घेतात.
जनता दलाच्या नेत्या सुशिला मोराळे म्हणाल्या, मिळालेले आरक्षण काढून घेतल्याने ओबीसींमध्ये नाराजी आहे. देशातील बहुमताचे सरकार नरड्याला नख लावत आहे. त्यांचा हेतू स्वच्छ नाही. आमचा संघर्ष विशिष्ट राजकीय पक्षांशी नसून आरक्षणासाठी आहे.
बैठकीला माजी आमदार रामराव वडकुते, शब्बीर अन्सारी, राजेंद्र वाघ, अर्चना पांचाळ, संजय विभूते, प्रदीप वाले, सुनील गुरव, दत्तात्रय घाडगे, अरुण खरमाटे, शशिकांत गायकवाड, आदी उपस्थित होते.