अमरावती, दि. 17 - वरूड नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहित महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करीत मध्यप्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.जीवन मांगीलाल मेवाडा (३६,रा.रामाखेडी,ता.आष्टा जि.सिहोर), जीवनसिंग भादरसिंग मेवाडा (२७ रा.सामरदा,ता. आष्टा जि. सिहोर), कमलाबाई मंगलसिंग ऊईके (५०, रा. मलकापूर, शे.घाट) व सरिता दीपक जोगेकर (४०, रा. मलकापूर, शे.घाट) यांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना मोर्शी येथे उघडकीस आल्याने मोर्शी-वरूड तालुक्यांत खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, २४ वर्षीय पीडितेला कमलाबाई हिच्या सांगण्यावरून सरिता उपचारासाठी वरूड येथे घेऊन आली. येथे कमलाबाईचा जावई जीवन मेवाडा याची भेट घालून दिली. तो काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून पीडितेला पांढुर्णामार्गे मध्य प्रदेशातील सिहोर येथील आष्टा यागावी घेऊन आला. तेथे ३५ हजार रूपयांत पीडितेची विक्री करीत जबरदस्तीने जीवनसिंग भांदरसिंग मेवाडा यांच्याशी लग्न लावून दिले. यानंतर जीवनसिंगने तिच्यासोबत इच्छेविरुद्ध लौंगिक संबंध प्रस्थापित केले.येथून आपली सुटका करून घेत पीडिता मलकापूर येथे आली. तिने आपली आपबिती भावाला सांगितल्यावर दोघांनी शेंदूरजनाघाट पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६६, ३७०, ३७६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे, एएसआय विजय लेवलकर, पोकाँ पुंजाराम मेटकर, गजानन पवार, महिला पोलीस प्रेमलता अमृते यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी डॉ. दिलीप जाणे.
उपचाराच्या नावाखाली विवाहितेला मध्यप्रदेशात विकले, दोन महिलांसह चार गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 7:47 PM