मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचा कार्यकाळ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यास आणखी चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच राज्यपाल कार्यालयाने कुलगुरू नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहे.शोध समितीसाठी एक सदस्यीय शिफारस मुंबई विद्यापीठाच्या समित्यांनी करावी, ही व्यक्ती मुंबई विद्यापीठाशी संबंधित नसावी, असे पत्र राज्यपाल कार्यालयाने मुंबई विद्यापीठाला पाठविले आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद आणि इतर समित्यांकडून संबंधित व्यक्तीची शिफासर कुलगुरू निवडीच्या सर्च कमिटीसाठी पाठविणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. वेळुकर यांची नियुक्ती त्यांच्या निवडीपासून वादग्रस्त ठरली आहे. त्याला न्यायालयातही आव्हान देण्यात आले. राजकीय नेते, प्राध्यापक, विद्यार्थी संघटना, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना पदावरून हटविण्याची वारंवार मागणी केली होती. वेळुकर यांचा साडेचार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळुकरांचा कार्यकाळ संपत येत असल्याने राज्यपाल कार्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी एक महिना अगोदर नवीन कुलगुरूंची निवड होऊ शकते. त्यामुळे प्रभारी कुलगुरू नेमण्याची गरज भासणार नाही. (प्रतिनिधी)
कुलगुरूंच्या निवड समितीसाठी नाव द्या
By admin | Published: February 16, 2015 3:56 AM