परभणी : खड्ड्याने चाळणी झालेल्या परभणी- गंगाखेड या रस्त्याकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रशासनावरील रोष व्यक्त करण्यासाठी व समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही समाजसेवींनी दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येत या रस्त्याचे ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्स्प्रेस हायवे’ असे नामकरण केले. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गंगाखेड रोडवरील जुन्या टोलनाक्यावर हा नामकरणाचा सोहळा पार पडला.
परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जिल्ह्यातील राज्य मार्ग असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात होत आहेत. एकीकडे गुळगुळीत रस्त्यांचे स्वप्न दाखविणा-या पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याच देशातील परभणीचा रस्ता मात्र मृत्यूचा सापळा बनला आहे. दोन ते तीन वर्षांपासून रस्ता खराब झाला असताना प्रशासन दुरुस्तीसाठी ढुंकूनही पहात नाही. परिणामी संतप्त झालेल्या काही समाजसेवी नागरिकांनी या रस्त्याला ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्स्प्रेस हायवे’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गंगाखेड रोडवरील जुन्या टोलनाक्यावर नामकरण सोहळा पार पडला. या नामफलकाचे उद्घाटन कॉ.राजन क्षीरसागर, स्वाभामानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष माणिक कदम, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने, शेकापचे कॉ.किर्तीकुमार बुरांडे, नितीन सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी माधुरी क्षीरसागर, शिवलिंग बोधने, माणिक कदम, नितीन सावंत, डिगांबर पवार यांनी मार्गदर्शन केले. श्रीनिवास जोगदंड, सुहास पंडित, अॅड.लक्ष्मण काळे, भास्कर खटींग, भगवान शिंदे आदींची उपस्थिती होती. वक्त्यांनी आपल्या भाषणात भाजप सरकार, स्थानिक आमदार व खासदार यांच्यावर जोरदार टीका केली.