यदु जोशी, मुंबईशिस्तप्रिय म्हणविणाऱ्या भारतीय जनता पार्टीत किमान सात जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदांवरून प्रचंड धुसफुस सुरू आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी महापालिका निवडणुकीला सामोरे जात असलेल्या मुंबईचे अध्यक्षपददेखील अडले आहे.मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना पुन्हा अध्यक्षपदाचे वेध लागले असले तरी आ. राज पुरोहित, आ. योगेश सागर इच्छुक आहेत. शेलार यांच्या नावाला काही वजनदार नेत्यांचा विरोध आहे. पण पर्यायी सक्षम नाव ते देऊ शकलेले नाहीत. शेलार यांच्या नावावरच पुन्हा शिक्कामोर्तब होईल, असे मानले जाते. तरीही घोषणेबाबत चालढकल केली जात आहे. मुंबईत काँग्रेससोबतच शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देणारा अध्यक्ष महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला लागणार आहे. त्यादृष्टीनेही शेलार यांच्याकडे बघितले जाते. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार अशा दिग्गज नेत्यांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूरमध्ये अध्यक्षपदाचा घोळ कायम आहे. विद्यमान अध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर यांना कायम ठेवण्याबाबत एकमत नाही. अहीर यांच्याकडून विजय राऊत यांचे तर मुनगंटीवार यांच्याकडून देवराव भोंगळे यांचे नाव समोर केले जात आहे. एकही मंत्रीपद न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात विद्यमान अध्यक्ष राजेंद्र डांगे यांना पुन्हा संधी देण्यास आमदार मदन येरावार यांचा विरोध असल्याचे बोलले जाते. ‘आम्हाला डांगे नकोत, जिल्हा सरचिटणीस मनोज इंगोले किंवा दुसरे कोणीही चालेल,’ असा पवित्रा त्यांनी घेतल्याची माहिती आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत वाद उफाळला आहे. मंत्रीपदापासून वंचित असलेल्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदाचा घोळ वाढला आहे. भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. संजय कुटे यांच्यापैकी एखाद्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी आशा कायम असताना जिल्हाध्यक्ष ठरत नाहीत, अशी स्थिती आहे. घाटावरचा अध्यक्ष केला पाहिजे, असा आग्रह धरून काँग्रेस-राष्ट्रवादी अन् नंतर भाजपा असा प्रवास केलेले माजी आमदार धृपतराव सावळे यांचे नाव पुढे केले जात आहे. सावळे मुंबईत ज्या इमारतीत राहतात तिथे राहणाऱ्या भाजपा नेत्यांचे आशीर्वाद त्यांना असल्याने स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बाहेरचे पार्सल कशाला, असा सवाल केला जात आहे. नंदुरबारमध्ये तब्बल १५ जण जिल्हाध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून तयार असल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. विद्यमान अध्यक्ष नागेश पाडवी पुन्हा शर्यतीत आहेत. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित कोणाला कौल देतात यावर अध्यक्ष ठरेल, असे दिसते.
अंतर्गत वादामुळे अडली भाजपा जिल्हाध्यक्षांची नावे
By admin | Published: March 06, 2016 3:28 AM