मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषण शैलीवर नेम साधताच सत्ताधारी बाकांवरील सदस्य चांगलेच भडकले. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना जाधव यांनी भाजप-सेनेला लक्ष्य केले. पंचेवीसहून अधिक योजनांना भाजप नेत्यांची नावे दिली. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्यपालांच्या भाषणात फक्त एका ओळीचा उल्लेख आहे. यापेक्षा तुम्हाला अधिक स्थान नाही, असा चिमटा त्यांनी शिवसेनेला काढला. आजवर आपण अनेक मुख्यमंत्री बघितले, पण सभागृहात हातवारे करून, आवाज वाढवून बोलण्यारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. त्यावर भाजपचे अतुल भातखळकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. तालिका अध्यक्ष देवयानी फरांदे जाधव यांचे वक्तव्य काढून टाकण्याचा निर्णय दिला. तालिका अध्यक्षांच्या या निर्णयावर जयंंत पाटील यांनी हरकत घेतली. लोकशाहीत टीका करण्याचा हक्क आहे. त्यांचे बोलणे असे काढून टाकता येणार नाही. विरोधकांची गळचेपी करायचीच असेल, तर आम्ही बाहेर जातो, असा इशारा दिला. राज्यमंत्री विजय शिवतारे तालिका अध्यक्षांच्या निर्णयाचे समर्थन करीत तुम्ही अध्यक्षांना निर्णय देणार का, असा सवाल वळसे पाटील यांना केला. यावर जाधव आणखीणच भडकले. चमचेगिरी बंद करा, असे त्यांनी शिवतारे यांना सुनावले. शेकापचे पंडितशेठ पाटील म्हणाले, ‘योजनांना नेत्यांची नावे दिली, तशी कार्यवाही व्हायला हवी. बेळगावसाठी लढा सुरू आहे. गेल्या भाषणात राज्यपालांनी यासाठी ठोस प्रयत्न करू असे म्हटले होते, पण एक वकील नेमण्यापलीकडे काहीच झाले नाही. राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असताना प्रश्न सुटलेला नाही.’
मुख्यमंत्र्यांवर नेम, सत्ताधारी भडकले
By admin | Published: March 17, 2016 12:40 AM