मुंबई : बिअर बार आणि दारूच्या गुत्त्यांना देवदेवतांची व महापुरुषांची नावे यापुढे देता येणार नाही. महापुरुष आणि देवतांच्या नावाचा गैरवापर रोखणारा कायदा करून येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.दारूची दुकाने, मांसाहारी खानावळ आणि लोकनाट्य कला केंद्रांवरील महापुरुष, गडकिल्ले व देवतांच्या नावाचे फलक तातडीने हटवण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, गुमस्ता आणि कामगार कायद्याअंतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीने यावर बंधन टाकता येणार नाही. मात्र याबाबत कामगार विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसेच दोन्ही सदनातील सदस्यांची बैठक घेण्यात येईल तसेच विधी आणि न्याय विभागाचे मत मागवून कायदा तयार करण्यात येईल.कायदा करताना बियरबार पुरता मर्यादित असावा, अशी अपेक्षा शिवसेना सदस्य नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. देवीदेवतांच्या नावांवरुन काही व्यक्तींची नावे ठेवण्यात आलेली असतात. अशा व्यक्तींवरुनही दुकानांची नावे दिली जातात. त्यामुळे कायदा करताना सर्व बाजूंनी विचार व्हायला हवा. डॉक्टर, टीचर्स अशा विदेशी मद्याच्या नावाला बंदी घालण्याबाबतची मागणीही या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान करण्यात आली, त्यावर उत्तर देताना यासंदर्भात अभ्यास करावा लागेल असे बावनकुळे म्हणाले. (प्रतिनिधी)
बारवरील महापुरुषांची, देवी-देवतांची नावे हटणार
By admin | Published: April 01, 2017 3:13 AM