मुंबई : नुकत्याच झालेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीत खाडसे, ताडस, गवाली, दाण्वे, वांगा आणि अदहलराव अशा आडनावांचे खासदार महाराष्ट्रातून निवडून आल्याचे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे! आयोगाने नव्या लोकसभेचे औपचारिक गठन करणारी हिंदी व इंग्रजीतील अधिसूचना रविवारी भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत देशभरातून निवडून आलेल्या ५४३ लोकसभा सदस्यांची नावे आणि त्यांचे पक्ष यांचा तपशील संलग्न परिशिष्टात दिला गेला आहे. यापैकी हिंदी अधिसूचनेत आयोगाने महाराष्ट्रातून निवडून आलेल्या ४८ पैकी तब्बल १३ लोकसभा सदस्यांच्या नावांची पार वाट लावून टाकली आहे. पुढील नावे वाचा म्हणजे त्यांचे मूळ इंग्रजीवरून हिंदी रूपांतर किती विनोदी आहे याची कल्पना येईल : खाडसे रक्षा निखिल (रावेर), अडसुल आनंदराव विठोबा (अमरावती), रामचंद्र चंद्रभानजी ताडस (वर्धा), नानाभाऊ फाल्गुनरॉव पटोले (भंडारा-गोंदिया), गवाली भावना पुण्डुलिकराव (यवतमाळ-वाशिम), जाधव संजय (बंधु) हरिभाऊ (परभणी), दाण्वे रावसाहेब दादाराव (जालना), चिन्तामन नावाशा वांगा (पालघर), अप्पा ऊर्फ चंदू बर्ने (मावळ), अदहलराव शिवाजी दत्तात्रे (शिरुर), धनंजय महादिक (कोल्हापूर), चव्हाण हरीशचंद्र देवराम (दिंडोरी) आणि गांधी दिलीपकुमार मंसुखलाल (अहमदनगर). आपली नावे, वडिलांची नावे व आडनावे यांची राष्ट्रभाषेत अशी हास्यास्पदरीत्या वाट लावण्याची संधीही आयोगाला मिळू नये, यासाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना आपले नाव इंग्रजीत न लिहिता शुद्ध मराठीत लिहावे हा यावरील अक्सीर इलाज आहे. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्रातल्या नव्या खासदारांची नावे चुकीची
By admin | Published: May 20, 2014 3:48 AM