Nana Patole on Badlapur School Case Accused Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. संध्याकाळी अक्षयला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्याच वेळी आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. निलेश मोरेंच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया येत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेबाबत ३ प्रश्न उपस्थित केले आहेत.
नाना पटोले यांनी ट्विट केले आहे की, बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही?
- फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?
- हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?
या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.
कसा झाला एन्काऊंटर?
आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या वेळी अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.