Nana Patole, Congress: राज्यात काँग्रेस पक्षात काही दिवसांपासून सारं काही आलबेल नाही असे बोललं जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले अशीही चर्चा होती. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांकडून पक्षांतर्गत गटबाजी असल्याच्याही चर्चा रंगल्या. आता या गटबाजीनंतर थेट दिल्लीतून पक्षांत मोठे बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, नाना पटोलेंनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
अधिवेशनासाठी विधिमंडळात असलेल्या नाना पटोलेंना पत्रकारांनी विचारलं, ठकाँग्रेसमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर दिल्लीतून मोठे फेरबदल केले जाणार आहेत अशी चर्चा आहे. त्यात तुमच्याही नावाचा समावेश असून प्रदेशाध्यक्षपद जाणार असं बोललं जात आहे. तुमची प्रतिक्रिया काय?” त्यावर नाना पटोलेंनी सूचक विधान केले. “काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ झाला नव्हता. गोंधळ निर्माण करण्याचं काम करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल होणारच आहेत. जे काही फेरबदल होतील ते सर्वांना मान्य करावे लागतील पण काँग्रेस पक्षात माझ्याविषयी नाराजी आहे ही केवळ माध्यमांमध्ये चर्चा आहे, पक्षात तसं काही नाही," असे ते म्हणाले.
दरम्यान, पक्षांतर्गत फेरबदलाच्या हालचाली होत असल्याच्या चर्चा अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीत. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यपद जाणार अशीही चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत पटोलेंकडून प्रदेशाध्यपद गेले तर बाळासाहेब थोरात यांना ते पद दिले जाऊ शकते का, याकडे लक्ष आहे. त्याशिवाय, सध्या झालेल्या दोन गटांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी तिसऱ्याच माणसाला ही जबाबदारी देता येऊ शकते अशीही चर्चा आहे.