राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्यासंदर्भात घोषणा केली. यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. यातच, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी, त्यांनी काँग्रेसचे उदारहण देताना, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, पण निर्णय राहुल गांधीच घेतात, असे वक्तव्य केले होते. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोचऱ्या शब्दात राऊतांना सुनावले आहे. ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी. परवा अजित दादांनीही तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात फार काही चोंबडेगिरी करू नका," असे पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले, "संजय राऊत हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर हे लांछन लावणे म्हणजे, सूर्यावर थुंकण्यासरखे आहे. गांधी कुटुंब हे त्याग करणारे कुटंब आहे. पंतप्रधान पदासारखे पद त्या कुटुंबाने सोडले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पद राहुल गांधी यांनी सोडले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार आणि खासदार राहिले आहेत. ते ब्लॉक अध्यक्षापासून काम करत आले आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे." एवढेच नाही, तर "मल्लिकार्जून खरगे यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणे आणि गांधी कुटुंबावर चुकीचा आरोप करणे, ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी. हे चुकीचे होईल. अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्याचे प्रवक्ते होता. परवा अजित दादांनीही तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात फार काही चोंबडेगिरी करू नका, एवढाच आमचा सल्ला त्यांना आहे, असे काँग्रेस प्रेदेशाधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.