Nana Patole: "केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर", काँग्रेसची बोचरी टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 11:28 AM2022-05-02T11:28:57+5:302022-05-02T11:29:05+5:30
Nana Patole: "राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, पण महाराष्ट्र शासन त्यासाठी समर्थ आहे."
मुंबई: 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. कालच्या सभेत राज यांनी सरकारला 3 ता तारखेचा अल्टीमेटम दिला असून, त्यानंतर मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसने टोला लगावला आहे.
'राज आणि देवेंद्र सारखेच'
नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "काल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचे भाषण केले, त्याच पद्धतीचे राज ठाकरेंनी भाषण केले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही," असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
'भाजपकडून मनसेचा वापर'
ते पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपने हे सर्व सुरू केले आहे. राज ठाकरेंसारख्या लोकांचा वापर करुन धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या भूमिकेमुळे आता राज्यातील जनता भाजपाला माफ करणार नाही.'' राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, त्यावर बोलताना पटोले म्हणतात, "चार तरखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. पण, त्यासाठी शासन सक्षम आहे. राज्य सरकार योग्य ती कारवाई नक्की करेल."
'महाराष्ट्राचा तमाशा थांबवा'
ते पुढे बोलताना म्हणाले की, ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा इशारा कुठेही कामात येणार नाही. त्यांनी सुरु केलेला धार्मिक वाद बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी हा वाद योग्य नाही, काँग्रेस धार्मिक वादात पडू इच्छित नाही. काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार आहे, असंही ते म्हणाले.