- अभिनय खोपडे वर्धा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून आज झालेला मंत्रीमंडळाचा विस्तारही असंवैधानिक असल्याची टिका करीत हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाकडे बोट दाखवत राज्यपालांनी एक वर्षापर्यंत विधानसभेचा अध्यक्ष होऊ दिला नाही. विचारणा केल्यावर असंवैधानिकतेचे कारण पुढे करण्यात आले. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच अध्यक्षाची निवड होत आज मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून त्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रमणा यांनीही दुजोराच दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले हे राज्यासाठी दुदैवच आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आपण म्हणत आहात, मग मंत्रीमंडळाचा विस्तार हा असंवैधानिक का असा प्रश्न विचारला असता आज मंत्रीमंडळाचा झालेला विस्तारही असंवैधानिक असल्याचे नाना पटोले यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. मंत्रीमंळाचा विस्तार झाला खरा पण मंत्री मंडळात किती महिलांना मंत्री म्हणून संधी मिळाली हे बघणे आज गरजेचेच असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारूलता टोकस, माजी पालकमंत्री आ. सुनील केदार, आ. रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे, अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, अशोक शिंदे, जिया पटेल, अमर वऱ्हाडे आदींची उपस्थिती होती.
भाजपची उलटगिणती सुरूबिहार राज्यात नितीश कुमार यांनी पाठिंबा काढला आहे. ही खऱ्या अर्थाने भाजपच्या उलटगिणतीची सुरूवात आहे. जीवनावश्यक विविध वस्तू आणि शेतमालावर जीएसटी लावून आम्ही किती महसूल गोळा केला आणि करणार याचा गाजावाजा केला जात आहे. पण सरकार पैसे किंवा नफा कमविण्यासाठी नसतेच. शिवाय जनतेला आधार देण्यासाठी असते हे वास्तव आहे. जीएसटीच्या नावावर जनतेच्या खिशातून पैसा तर कर्जाच्या नावावर विदेशातून कर्ज काढले जात आहे. पण पैसा जातो कुठे असा प्रश्न याप्रसंगी नाना पटोले यांनी उपस्थित केला.बॉक्स
चित्रफितून मांडले ईडीच्या भीतीचे वास्तवभाजपच्या विरोधात बोलल्यास ईडीचा ससेमीरा लागेल किंवा लावला जाईल अशी भीती सध्या सर्वसामान्यांमध्ये आहे. भाजपच्या विरोधात बोलल्यास किंवा विरोध केल्यास अडचणीत भर पडेल याबाबत सध्या सर्वसामान्यही बोलके होत असल्याचे उदाहरण नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या चित्रफित पत्रकार परिषदेदरम्यान दाखवून सर्वसामान्यांच्या मनातील ईडीच्या भीतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.