आगामी निवडणुका Congress स्वबळावरच लढवणार, BJP जमीनदोस्त होणार, Nana Patole यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:11 AM2021-10-13T11:11:47+5:302021-10-13T11:12:20+5:30
Congress, Nana Patole News: एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
नांदेड : एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते सपत्नीक आले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, देशात महागाईचा उच्चांक झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल शंभरीच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहेे. मात्र, विद्वेषाची परंपरा असलेल्या भाजपला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. या सर्वांवरून लक्ष वळविण्यासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. हे सर्व माध्यमावर सातत्याने दाखविले जात आहे. हा सर्व प्रकार आता जनतेला कळला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होईल.
भाजपला पर्याय काँग्रेसच : एकत्र लढल्याने नुकसानच झाले आहे हे पंढरपूरच्या निवडणुकीत दिसले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, दरवेळी काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे जाणीवपूर्वक विभाजन करण्यात आले. प्रत्येकाने हे विभाजन केले. त्यामुळे जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली. त्यामुळे भाजपला पर्याय हा काँग्रेसच असल्याचे त्यांनी सांगितले.