Congress Nana Patole News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने दावा केला होता. यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला. या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. राज्यसभा आणि लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, काँग्रेसने या निर्णयावरून केंद्रावर टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत घेतलेल्या निर्णयावरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते, याची आठवण नाना पटोले यांनी यावेळी करून दिली.
विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे
केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह घड्याळ आणि पक्ष हे दोन्ही काढून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले. असाच प्रकार शिवसेनेच्या बाबतीत झाला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला. इतकी वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र, अशा पद्धतीने वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला. ही एका अर्थाने लोकशाहीची हत्या आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली.