“भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू”; काँग्रेसचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:46 PM2023-07-12T18:46:37+5:302023-07-12T18:51:50+5:30
राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपविरोधात वणवा पेटला आहे. या वणव्यात भाजपाचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
Congress Nana Patole News: राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. एक दिवसाचे मौन सत्याग्रह संपले आता भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू, असा असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह करण्यात आला. या मौन सत्याग्रह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आ. वर्षा गायकवाड, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपविरोधात वणवा पेटलाय
मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरम करुन सोडले होते. आज त्याच अस्त्राचा वापर काँग्रेसने भाजप सरकारच्याविरोधात केला आहे. भाजपच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकारविरोधात हा लढा सुरु आहे. हा लढा मुंबईसह महाराष्ट्रभर आणखी तीव्र करुन भाजपाचा भांडाफोड करु. राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असताना अदानी-मोदी संबंध काय आहेत असा सवाल विचारल्यानंतर मोदी सरकार घाबरले व आपले पितळ उघडे पडणार या भितीतून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटी कारवाई केली आहे. देशातील जनता हे सर्व पहात असून राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपविरोधात वणवा पेटला आहे आणि या वणव्यात भाजपाचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही.