"मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न फसवे’’, नाना पटोले यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 08:08 PM2024-07-13T20:08:23+5:302024-07-13T20:08:57+5:30
Nana Patole criticizes Prime Minister Narendra Modi: मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली फेकाफेकी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई - मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर दिल्लीला दिला जातो असे असतानाही राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो हे उघड असताना मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली फेकाफेकी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्यांचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदींनी मुंबई व महाराष्ट्राच्या विकासाचे मोठ मोठे दावे केले असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. महाराष्ट्र केंद्र सरकारला सर्वात जास्त कर संकलन करुन देते मात्र राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. मागील महिन्यातच जाहीर झालेल्या आकडेवारीत महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांना जास्त निधी दिला हे वास्तव आहे. महाराष्ट्र प्रगती करत आहे हे जरी थोड्यावेळासाठी ग्राह धरले तरी केंद्र सरकारच्या आकडेवारीवरूनच महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे दिसते. दरडोई उत्पन्नात ११ वा क्रमांक, निर्यातीच्या बाबतीत मागे, परकीय गुंतवणूक व रोजगार निर्मितीतही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत मागे आहे. महाराष्ट्रात लाखो रोजगार निर्माण होतील असे मोदींनी सांगितले असले तरी बेरोजगारांची संख्या पाहता मोदींच्या दाव्यात काहीच दम नाही हे स्पष्ट होते. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असतानाही त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या बंदरामुळे केवळ अदानीचा फायदा होणार असून मच्छिमारी व्यवसाय बंद पडणार आहे. महाराष्ट्राने प्रगती करावी असे जर मोदींना वाटत असते तर महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले नसते.
मोदींनी आजच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांसह, महापुरुष व संतांची नावे घेतली, महाराष्ट्राला थोर संत महापुरुषांची परंपरा लाभलेली आहे पण त्यांचा अपमान भाजपा नेते सातत्याने करत असतात. निवडणुका आल्या की या महापुरुषांची भाजपाला आठवण येते. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्याने आता विधानसभा निवडणुकीत पराभव होईल या भितीने महापुरुष व संतांचे नामस्मरण मोदींनी केले. अरबी समुद्रातील शिवस्मारक व इंदू मील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्याप झालेले नाही याचा विसर मोदींना पडला असावा वाटते, असेही नाना पटोले म्हणाले.