"पराभव दिसू लागल्याने भाजपाकडून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने", नाना पटोलेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:42 PM2024-01-17T17:42:38+5:302024-01-17T17:45:21+5:30

Nana Patole criticizes BJP: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे भाजपाच्याच सर्वेत दिसून आल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole criticizes "temptations from BJP to leaders of other parties as defeat is visible" | "पराभव दिसू लागल्याने भाजपाकडून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने", नाना पटोलेंची बोचरी टीका

"पराभव दिसू लागल्याने भाजपाकडून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने", नाना पटोलेंची बोचरी टीका

मुंबई -  भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यातून व केंद्रातूनही सत्तेच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे. १० वर्षात केवळ घोषणाबाजी, जाहिरात बाजी आणि खोटेपणा करून सत्ता चालवली. जनतेला आता भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे दिसले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे भाजपाच्याच सर्वेत दिसून आल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, त्यांना पराभव दिसू लागला आहे, महाराष्ट्रातून निवडून कसे यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. भाजपाकडे विचारसरणी राहिलेली नाही, काहीही करून सत्ता मिळवणे व सत्तेतून जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटायचे एवढीच त्यांची विचारधारा राहिली आहे, देश विकून देश चालवला जात आहे. काँग्रेसचे लोकनेते भाजपात कसे येतील यासाठी ते प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच त्यांना भाजपाने ऑफर दिली होती असे जाहीरपणे सांगितले आणि ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत हेही स्पष्ट केले आहे. भाजपाला सत्तेचा मोह किती झाला आहे याचे दर्शन यातून होते. भाजपाकडे नेते नाहीत व उमेदवारही नाहीत, त्यांच्या पक्षात काँग्रेस व इतर पक्षातीलच अनेक नेते आहेत. भाजपाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा युवक काँग्रेसमध्ये होते.

माजी खासदार मिलिंद देवरांबद्दल प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, देवरा कुटुंब ५० वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये होते, विविध पदे भूषवली, खासदार झाले, मंत्री झाले त्यावेळी त्यांना काँग्रेस नकारात्मक आहे असे वाटले नाही आत्ताच कसे वाटू लागले. देवरा म्हणतात विकासासाठी शिंदेसेनेत गेलो पण त्यांचा व्यक्तिगत विकास थांबला होता म्हणून ते गेले आहेत. काँग्रेस पक्ष  व काँग्रेसचे नेतृत्व सकारात्मकच आहे, काँग्रेससाठी देश प्रथम आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावेळी गुजरातमध्ये होत आहे, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जेव्हा जव्हा नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्रातून काही ना काही गुजरातला घेऊन गेले. ते देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे? याआधी महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला घेऊन गेले. काल परवा आले आणि मुंबईतील ग्लॅमर असलेला फिल्म फेअर सोहळाही गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्र लुटला जात आहे आणि राज्यातील हस्तक गुजरात लॉबी सांगेल त्याप्रमाणे वागत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Nana Patole criticizes "temptations from BJP to leaders of other parties as defeat is visible"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.