नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. 'मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावं लागेल', असा टोला नाना पटोलेंनी लगावला.
मीडियाशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, 'संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसनेही मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं. डीएनए एक म्हणणारे मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल', असा टोला पटोलेंनी लगावला.
काय म्हणाले होते मोहन भागवत?मोहन भागवतांनी एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचं म्हटलं होतं. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे, त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे. ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली.त्यामुळेच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला हवा, असं मोहन भागवत म्हणाले होते.