"मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल",नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:39 PM2022-10-19T16:39:00+5:302022-10-19T16:40:58+5:30
Mallikarjun Kharge: मल्लिकार्जून खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई - काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. मल्लिकार्जून खर्गे यांचा दांडगा अनुभव व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला समान संधी देणारा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्ष कार्यकर्ते निवडतात इतर पक्षांसारखा अध्यक्ष लादला जात नाही. काँग्रेस पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकर्दीला सुरुवात करून नगराध्यक्षपद, कामगार नेते, आमदार, खासदार, कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध खात्यांच्या मंत्रिपदावर आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली.
काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना आणि लोकशाही मानणारा पक्ष आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, जगजीवन राम, निलम संजीव रेड्डी, के. कामराज, जगजीवनराम, शंकरदयाल शर्मा, इंदिराजी गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांचे नेतृत्व लाभले आहे. मा. सोनियाजी गांधी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये नेतृत्व करून पक्षाला नवसंजीवनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. मल्लिकार्जुन खर्गे आता पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून खर्गे यांच्या नेतृत्वाखाली जात्यांध, धर्मांध, हुकुमशाहीवृत्तीच्या सरकारचा पराभव करू असे पटोले म्हणाले.