काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:52 PM2024-12-11T13:52:17+5:302024-12-11T13:56:56+5:30
Maharashtra Politics: महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे कुणी आले तर आमचा पक्ष स्वागत करतो, असे भाजपाने म्हटले आहे.
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे अजूनही गृहखात्यावरील दावा सोडलेला नसल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजपा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार भेटतात. त्यांचे दुःख मांडतात. काँग्रेस नेतृत्व निवडून आलेले आमदार, खासदार यांच्याशी संपर्क करत नाही. काँग्रेस नेतृत्वाचे दुर्लक्ष आहे. काही लोक अस्वस्थ आहेत, त्यामुळे पुढे पाहू काय होते. महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे कुणी आले तर आमचा पक्ष स्वागत करतो. कुणी पक्षात येते किंवा जे अस्वस्थ प्रतिनिधी येणार आहेत त्यांना वाटते की, विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. त्यामुळे आमच्या संपर्कात काही खासदार आणि आमदार आहेत. काही लोकप्रतिनिधी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आमच्याशी चर्चा करत आहेत. काही राज्याच्या राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत, असा मोठा दावा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया
नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमचे सर्व खासदार आमच्या बरोबर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं? हे फार गांभीर्याने घेऊ नका. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. ऑपरेशन लोटसच्या चर्चांवर आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महायुतीच्या सरकारची काय परिस्थिती आहे? हे या हिवाळी अधिवेशनात दिसेल, असा पलटवार नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते. कारण त्यांच्याकडे पैसा आणि यंत्रणा आहे. याआधीही अशा प्रकारे माणसे फोडलेले आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेले? भीती पोटीच गेले ना? ते पण ऑपरेशन लोटस नव्हते तर ऑपरेशन डर होते. त्यामुळे ते घाबरून तिकडे गेले. भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे असे सुरु आहे. भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही. आता २० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल. गृहखाते कोणाकडे द्यायचे हे ठरत नसेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.